
साखरखेर्डा : साखरखेर्डा ते मेहकर रस्त्यावर वाटमारी करणाऱ्या ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
साखरखेर्डा : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत साखरखेर्डा ते मेहकर रस्त्यावर वाटमारी करणाऱ्या ६ आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. साखरखेर्डा ते मेहकर रोडवरील काळे पाणी शिवारात ४ जानेवारी रोजी रात्री ८. २० वाजता मायक्रो फायनान्स कंपनीच्या २ कर्मचाऱ्यांना अडवून १ लाख ४१ हजारांची रोकड लंपास केली होती. पवन नारायण हागे यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने आणि साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गणेश दादाराव गवई याला ताब्यात घेतले होते.
या रोड रॉबरी प्रकरणात त्याने सहभागी आरोपीतांची माहिती दिली. त्यावरुन साखरखेर्डा पोलिसांनी मंगेश रविंद्र गवई, विलास केशव खरात, अंकित दत्तात्रय जगताप, आविष्कार
तुषार गवई, अभिमन्यू रामभाऊ मंडळकर यांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार रुपये हस्तगत केले. तर २ मोटारसायकली, १ पिस्तूल, २ धारधार शस्त्रे जप्त केली. तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेतल्यानंतर आविष्कार तुषार गवई यांच्याकडून दुचाकी मोटारसायकल ताब्यात घेतली.
साखरखेर्डा बसस्थानकावरून आरोपीने ही मोटारसायकल चोरुन नेऊन आमराईत लपवून ठेवली होती. ती ८ जानेवारी रोजी ताब्यात घेतली आहे ९ जानेवारी रोजी पोलीस कोठडी रिमांड संपल्याने न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार गजानन करेवाड हे करीत आहेत.