
शिरपूर : पोटाच्या मुलानेच केली आईची हत्या
शिरपूर– शिरपूर तालुक्यातील ताजपुरी शिवारात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. जेवणासाठी बनवलेली माशांची भाजी कुत्र्यांनी खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलानेच आपल्या आईला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताजपुरी शिवारात देवेंद्र भलेसिंग राजपूत यांच्या शेतात रखवालदारीसाठी काही कुटुंबे राहतात. याच ठिकाणी राहणारा अवलेश रेबला पावरा याने त्याची आई टापीबाई रेबला पावरा (वय ६७) हिला माशांची भाजी बनवण्यासाठी सांगितले होते. टापीबाई यांनी भाजी बनवून ठेवली होती, मात्र शेतातील कुत्र्यांनी ती भाजी खाल्ली. याच क्षुल्लक कारणावरून अवलेशला प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने आपली वृद्ध आई टापीबाई रेबला पावरा यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच थाळनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संशयित अवलेश पावरा घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी अवलेश पावरा याचा शोध सुरू केला. थाळनेर पोलिसांनी सुमारे ४ किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवून अवलेश पावरा याला आधे शिवारातील केळीच्या शेतातून ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात समाधान भाटेवाल, संजय धनगर, भूषण रामोळे, उमाकांत वाघ, किरण सोनवणे, योगेश पारधी, रामकृष्ण बोरसे, रणजीत देशमुख, मुकेश पवार, दिलीप मोरे, आकाश साळुंखे, होमगार्ड मनोज कोळी आणि राजू पावरा यांचा समावेश होता. पोलिसांनी संशयित आरोपी अवलेश पावरा याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे.