मालेगाव/नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्त विद्यमानाने निर्भय कन्या अभियान संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शंकर कदम यांनी भूषवले. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ॲड. सौ माया खैरनार प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. महिला अत्याचार विरोधी कायदे यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त अपराधी असतो असे त्यांनी यावेळी वक्तव्य केले.
यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. श्रीमती खुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. निर्भय कन्या अभियानाचे महत्त्व व त्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती यावेळी प्रा. खुणे यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. शंकर कदम यांनी महिलांना समानतेने वागवण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. मानसी महाजन, प्रमुख अतिथींचा परिचय तृतीय वर्ष विद्यार्थी प्रवीण जगताप व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी श्वेता नागपुरे यांनी केले. त्यानंतर कुणाल चव्हाण आणि श्रावणी परदेशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कराटेच्या सहाय्याने आत्मबचावाचे धडे दिले. यावेळी त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने डावपेच शिकवले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.