
काँग्रेसने भाकरी फिरवली.
नाना युगाचा अस्त, स्वच्छ चेहऱ्याच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद.!
मुंबई : विराम पवार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस पक्षाने भाकरी फिरवली आहे. नाना पटोले यांना अध्यक्षपदावरून दूर सारत स्वच्छ प्रतिमा असलेले विदर्भातील नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. तसेच विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळ पक्षनेतेपद ही दोन्ही पदे विदर्भाकडेच असणार आहेत, हे विशेष.
महाविद्यालयीन जीवनापासूनच गाडगे महाराज,तुकडोजी महाराज व गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत.
त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधान सभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत.
एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.