
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांना मंगळवार दि.१० सुरुवात होत आहे. यंदा कॉपीमुक्त वातावरणात आणि सुरळीत परीक्षा पार पडण्यासाठी बोर्ड प्रशासनाने व्यापक तयारी केली असून १० फेब्रुवारीला पहिला इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे. यंदा परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी बोर्डाने कंबर कसली असून, प्रत्येक परीक्षा खोलीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहेत. ज्या केंद्रामध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नाही, अशा केंद्रामधील कर्मचारी दुसऱ्या केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा फायदा घेता येणे शक्य होणार नाही. यावर्षी सर्वच केंद्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहे. कॉपी प्रकरणे, डमी, परीक्षा केंद्रात उशिरा पोहोचणारे विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट, मोबाईल आणणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाईचे निर्देश बोर्डाकडून देण्यात आलेले आहेत. शाखानिहाय विद्यार्थी विज्ञान ९६६२५ कला ५४८८१ वाणिज्य १९०६३, व्यावसायिक २९४३, तांत्रिक विज्ञान शाखा १७९ परीक्षा देणार आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (MSBSHSE) दहावी SSC आणि बारावी HSC बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाचा माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शिक्षण मंडळाने इन कॅमेरा प्रश्नपत्रिका पाठविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका पॅकेट व्यवस्थित पाठवले जाईल. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार होणार नाहीत. तसेच इन कॅमेरा ते केंद्र संचालक यांच्याकडे दिल्याने त्यांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. प्रश्नपत्रिकांचे पाकीट हातात दिल्यापासून ते कपाटात ठेवण्यापर्यंत त्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे. यामुळे परिरक्षकापासून ते केंद्र संचालक यांच्यावर ‘वॉच’ राहणार आहे.
बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत नेणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ठरलेल्या वेळेत केंद्रावर पोहोचून आपली उपस्थिती नोंदवावी.












