
o
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत असलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित)च्या विविध प्रकल्पांचा आढावा विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.
बैठकीत ठाणे समूह विकास प्रकल्प, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि डेटा सेंटर प्रकल्प, भिवंडी महापालिकेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठीचा रुफ टॉप सोलर प्रकल्प, एनटीपीसी ग्रीन सोबत सोलर/हायब्रीड प्रकल्प राबविणे, एनटीपीसी ग्रीन, एनआयआरएल, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -एसईसीआय यांच्या संयुक्त भागीदारीने उभारण्यात येत असलेले सौर उर्जा प्रकल्प, डिस्ट्रीक्ट कुलिंग सिस्टीम प्रकल्प, नागपूरमधील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या आवारात सोलर प्रकल्प उभारणे, पुणे महापालिकेचे एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर उभारणे, महालक्ष्मी मंदिर व परिसराचा पुनर्विकास आदी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.