
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत वांद्रे कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या करुणा शर्मा यांना मोठे यश आले आहे.
धनंजय मुंडे यांनी प्रत्येक महिन्याला दोन लाख रूपये पोटगी द्यावी असा कोर्टाचा आदेश.
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारात दोषी आढळल्यानंतर करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक आरोप केले. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा नोकर असूनही त्याच्याकडे ४ हजार कोटींची मालमत्ता आहे पण मी धनंजय मुंडे यांची पहिली बायको असूनही माझ्या नावावर धनंजय मुंडे यांनी फुटकी कवडीही जमा केली नाही. माझ्याकडे आणि माझ्या मुलांकडे धनंजय मुंडे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करते परंतु न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशावर समाधानी नाही. मी उच्च न्यायालयात जाणार आहे, असे करुणा शर्मा यांनी सांगितले.
करुणा शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्याविरोधात मी आतापर्यंत एकटीच लढले. माझ्यासोबत कुणीच नव्हते. धनंजय मुंडे यांनी अनेक काळ माझा मानसिक आणि शारिरिक छळ केला. खोट्या केसेसमध्ये मला धनंजय मुंडे यांनी बीड आणि येरवड्याच्या तुरुंगात ठेवले. आत्ता जेलमध्ये असलेला गुंड वाल्मिक कराडने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मला मारहाण केली. माझ्या गालाला हात लावण्याची त्याने हिम्मत केली. नको नको तिथे स्पर्श केले, असे गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केले आहेत.