
*सिध्दीविनायक मंदिर न्यासा कडून भाविक भक्तांसाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडला तृप्ती देसाई यांचा विरोध.*
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : देश-विदेशातील लाखो भाविक मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिर 1801 साली बांधलं गेल्याचं सांगितलं जातं. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी हे एक आहे. या मंदिराची बांधणी देखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. गर्भगृहाच्या आतील छतावर सोन्याचा मुलामा चढलेला असून मध्यवर्ती भागी गणेशाची मूर्ती आहे. हे मंदिर प्रभादेवी येथे असून सिध्दीविनायक नावाने प्रसिद्ध आहे.
*मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सिध्दीविनायक मंदिर न्यासाकडून भाविक भक्तांसाठी ड्रेस कोड नियम लागू*
सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. ड्रेसकोडनुसार कपडे परिधान केलेले नसतील तर मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश नाकारला जाईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र या नियमावरुन आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून लागू करण्यात आलेल्या या नियमाला सामाजिक कार्यकर्त्या तसेच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी विरोध केला आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हा निर्णय मागे घेतला पाहिजे अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. मंदिरात कोणते कपडे घालू यायचे हे भक्तांना चांगलं कळतं तुम्ही शिकवण्याची गरज नाही, असा टोलाही तृप्ती देसाईंनी लगावला आहे.