
प्रतिनिधी विराम पवार मुंबई : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतीं स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री नृसिंहवाडी.
हे ठिकाण कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यात नरसोबाची वाडी म्हणूनही प्रचलित आहे. जाणून घेऊया या पवित्र देवस्थानां बाबत….दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्रीनृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी 12 वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडल्याचे सांगितले जाते.
ऐतिहासिक माहितीनुसार, नरसोबा वाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशाहच्या सांगण्यावरून आदिलशाह नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले आणि नवस बोलला. पुजार्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला आणि त्या पवित्र स्थानी तो नतमस्तक झाला तसेच त्याने कृष्णा नदीवरील औरवाड आणि गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. नरसोबाची वाडी (गुरूचरित्रातील उल्लेख आमरापूर) मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही.
श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त.!