
नदी पुला जवळ सर्व फेरीवाल्यांवर
वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी केली कारवाई
कारवाईनंतर नागरिकांनी केला संताप व्यक्त
चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याजवळील नदन पेढा समोर व नदी पुलाच्या कडेला रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली. रहदारीस अडथळा होतो म्हणून नदी पुलाच्या कडेला असलेले हे अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र,या कारवाईनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. फक्त फेरीवाल्यांवरच कारवाई, मग बेशिस्त वाहनांवर कधी कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शहरातील अनेक व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने दुकानदार आणि ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अनेक भागात वाहतूक कोंडी हा नेहमीचा चर्चेचा विषय ठरतो. दरम्यान, भाजी विक्रेत्यांमुळे अडथळा निर्माण होत असेल, तर रस्त्याच्या कडेला बेशिस्त उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे होणारा अडथळा दुर्लक्षित का? असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, फेरीवाल्यांवर कारवाई करताना मोठ्या व्यापाऱ्यांना मात्र सूट का दिली जाते? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर वाहतूक शाखेने शहरात सर्वांना न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.