प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर, नाशिक : कसबे सुकेणे येथून जवळच असलेल्या खेरवाडी येथील शेतकरी खंडेराव कोंडाजी लांडगे यांच्या वस्तीवर गायीवर शनिवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करीत जागीच ठार केले.
निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी, सुकेणे या शिवारात सातत्याने बिबट्याचा संचार असल्याचे स्पष्ट होत आहे. खेरवाडी शिवारात खंडेराव कोंडाजी लांडगे यांच्या शेताशेजारीच ऊस व पाटचारी असल्याने भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने लांडगे यांच्या वस्तीवर बाहेरच दावणीला बांधलेल्या गाईवर हल्ला केला. उन्हाळा असल्याने लांडगे कुटुंब बाहेरच झोपले होते, मात्र सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले असले तरी गाईच्या मृत्यूने लांडगे परिवाराला दुःख झाले आहे. महिनाभरापासून खेरवाडी परिसरातील गावातील विविध वस्त्या व मळ्यांमध्ये नर व मादी या दोन बिबट्यांनी दोन-तीन श्वान व एका शेळीचा फडशा पाडला आहे. पाणी व भक्ष्याच्या शोधात असलेली ही जोडी वारंवार जागा बदलत असल्याने वनविभागाने पिंजरा लावूनही ती सापडलेली नाही. गेल्या चार दिवसांपासून जि. प. शाळा व न्यू गुरुकुल पब्लिक स्कूल या दोन्ही शाळेच्या लगतच बिबट्याने आश्रय घेतल्याने ग्रामस्थांत बिबट्याच्या दर्शनाने घबराटीचे वातावरण आहे.