लातूर रिपोर्टर.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण जरांगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी बीडमध्ये (Beed) मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान त्यांच्या याच दौऱ्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतांना देखील रॅली काढून जीसीबीने धोकादायक पद्धतीने फुल उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर आणि पेठ बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर
मनोज जरांगे पाटील हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्याठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत करण्यात आलं. तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.









