प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर -मालेगाव : शहराजवळील नॅशनल पेट्रोलपंपामागे खेळतांना ओवाडी नाल्यात पडल्याने पाचवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शहरातील मोठ्या नाल्यांमध्ये पडून चार महिन्यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.
मोहम्मद शहजाद (५) रा.नमरा मशिदजवळ हा खेळतांना पेट्रोलपंपाम ागील नाल्यात पडला. सायंकाळी पाचपर्यंत मुलगा घरी न दिसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. परिसरात सर्वत्र शोध घेतल्यानंतर बुधवारी (ता. १७) रात्री दहाच्या सुमारास मृतदेह नाल्यात तरंगून वर आलेला आढळून आला. जिया मुस्कान व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तो पाण्यातून बाहेर काढला. रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील काही धर्मगुरु, आजी, माजी लोकप्रतिनिधींनाही माहिती देण्यासाठी भ्रमणध्वनी केला असता कोणत्याही धर्मगुरु व लोकप्रतिनिधींनी भ्रमणध्वनी उचलला नाही. त्याबद्दल या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली.