थाणेमहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी कल्याणमध्ये

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी कल्याणमध्ये येत आहेत.

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी कल्याणमध्ये येत आहेत. आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते ऑनलाईन माध्यमातून काही प्रकल्पांचे लोकार्पण तर, काही कामांचे भूमिपूजन करतील. अत्रे रंगमंदिरात संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.कल्याण मधील गौरीपाडा येथील सीटी पार्क, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पणानंतर नागरिकांसाठी खुली केली जातील. याशिवाय, केडीएमटी परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील नऊ विद्युत बस, विविध प्रकल्प बाधितांना सदनिकांचा ताबा, अमृत टप्पा दोन योजनेतून गौरीपाडा येथे ९५ दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणे, अग्निशमन केंद्र, क प्रभाग क्षेत्र इमारतीचे लोकार्पण या सोहळ्यांचा या कार्यक्रमांमध्ये अंतर्भाव आहे.आधारवाडी येथील पालिकेच्या राखीव भूखंडांवर अग्निशमन मुख्यालय आणि केंद्र, क प्रभाग कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी प्रशासनाने १३ कोटी ६५ लाखाची तरतूद केली आहे. सीटी पार्क हे कल्याण-डोंबिवलीतील मनोरंजनाचे केंद्र असणार आहे. याठिकाणी मनोरंजन, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, ॲम्फी थिएटर, फूड प्लाझा सुविधा आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार करून केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे केडीएमटी उपक्रमात २०७ विद्युत बस धावणार आहेत .या बसमधील नऊ बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. भारीत केंद्र सुरू झाल्यानंतर या बस प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.

Show More
Back to top button
error: Content is protected !!