
विठू माऊलीच्या छत्रछायेची आध्यात्मिक अनुभूती देणारा “आषाढी वारी पंढरीची”: विद्रोही कवी साहेबराव मोरे
कवी रामचंद्र गुरव यांनी “आषाढी वारी पंढरीची”हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह समीक्षणार्थ स्नेहपूर्वक पोहच केला . कविता वाचताना भक्तगण अर्थात वारकरी आणि विठूराया यांच्यातल भक्तीमय प्रेम किती अलौकिक असतं याची प्रचिती येत होती, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांचा उत्कट भक्तीयोगाच संकर्षण दर्शन होत होतं
आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी परब्रह्माला डोळे भरून पाहण्याचा परमोच्च आनंद बिंदू, अविस्मरणीय क्षण.वर्षागणिक युगे अठ्ठावीस उभ्या असलेल्या विठोबाच्या काळ्या जादूचा उतारा कुठल्याच मदार्याला,जादूगाराला आजतागायत गवसलेला नाही.समता, बंधुभाव व मानवतेची शिकवण महाराष्ट्रभूभीत रूजवली ती संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव ,संत गोरोबा, संत चोखामेळा ते संत मुक्ताई,जनाई यांनी .तीच मानवतावादी विचारांची पालखी लाखो वारकरी अखंडपणे वाहताहेत वर्षानुवर्ष.भारतीय संविधानाला अभिप्रेत राष्ट्र उभारणी व्हावी म्हणून संतांच्या मानवतावादी मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी “संविधान समता दिंडी” चा समावेश यावर्षी वारीत होणे ही अंत्यत महत्त्वाची घटना मानावी लागेल.
ऍड. उमाकांत आदमाने संपादित “आषाढी वारी पंढरीची”हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आज आषाढी एकादशीला प्रकाशित होतो आहे हा दुग्ध -शर्करा योग.काव्यसंग्रहात ४०कवितांचा समावेश आहे. संग्रह वाचताना भक्तिरसाने ओतप्रोत ओसंडून वाहणार्या रचनांनी आनंदाश्रू पाझरू लागलेत ही काव्यसंग्रहाची ताकद व बलस्थान म्हणता येईल.सहज सोप्पी ओघवती भाषा हे एक भाषिक वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवले.
कवितांची निवड व संकलन कवी रामचंद्र गुरव यांनी केले आहे, ते गौरवास पात्र ठरतात .
“नाही कर्म धर्म संगे
ना चिंता काळजी घोर
मागे सोडून सोडून
वारी चालली चालली”
रामचंद्र गुरव यांच्या काव्यपंक्ती सर्वधर्म समभावाची पुष्टी करतात
वैभवी घोडके ‘गळाभेट’कवितेत भक्त आणि विठूराया, यांच्यातील भावभावनांचे अनुबंध
माय तू मी लेक , यांच्यातलं भक्तीमय प्रेम आविष्कृत करताना लिहीतात,
“वारीचा सागर भक्तीचा उधाण/
अंतरी विठू अखंड//”
‘किती दिवस उभा’ अभंगांत पुंडलिकाने विठूरायास थांबायला सांगितले.भक्त आज्ञा मानून अठ्ठावीस युंग विटेकर उभाच आहे, तसाच बळीराजा पोटासाठी बांधावर उभाच आहे. ही कैफियत उपेंद्र रोहनकर यांनी समर्पित भावनेने मांडली आहे.
“दरवर्षी तूझ्या उत्पन्नात भर
आम्ही दारोदार भटकतो/”
विठ्ठलभक्ती रंक -राव , कष्टकरी -शेतकरी सर्वांचेआदितत्व आहे,जगण्याचा प्रासादिक स्रोत आहे. म्हणूनच कवयित्री संगीता कांबळे,’बां माझा बिंदू ‘कवितेत हा आशावाद व्यक्त करतात
‘”हाक लेकराची
धाव माऊलीची
साथ सोबतीची
सदा विठोबाची'”
वारीचे प्रमुख आकर्षण म्हणजे टप्प्याटप्प्यात स्थिरावत , साकारले जाणारे “रिंगण”. रिंगणात सर्व समावेशक, सर्व स्तरातील भक्तगण, सर्वधर्मीय भान हरपून येथेच्छ धावतात , मनमुरादपणे फुगड्या खेळतात.कुठलेच बंधन नसते. समतेच्या सम्यक सोहळ्याचे कवियत्रि ज्योती घनघाव यांनी “माझा विठूराया”अभंगांत सामर्थ्याने अंकीत केलेले चित्तवेधक चित्रण,
“किती अजब सोहळा
सूर ताल घूमे हिंगणी
विठू नामाचा जयघोष
पांडुरंगअवतरला अंगणी”
साक्षात पांडुरंगच भक्तासवे फुगड्या खेळतात ही स्वानुभूती अनुभवायला येते
सर्वच कवी कवयित्रींच्या कविता उत्कट भावार्थ मांडणाऱ्या प्रगल्भ प्रतिभेच्या प्रत्यय देणार्या आहेत. हा संग्रह प्रत्येक भक्तांच माऊलीवरच असीम प्रेम, निर्व्याज भावबंध अधोरेखित करणारा असल्याने संग्रही ठेवावा .
वाचकांनी भाव सागरातील
भक्तीरसाच्या अगाध गहराईत आत्मसमर्पित होण्यासाठी हा संग्रह आवर्जून वाचायला हवा.
विठ्ठलभक्तीने भारावलेल्या काव्यसंग्रहाला डॉ शिवचरण उज्जैणकर यांनी प्रांजळ शुभेच्छा देऊन उपकृत केले आहे.साहित्यरत्न प्रकाशनाने देखणा व वाचनीय संग्रह रसिकांना उपलब्ध करून दिला आहे, एकंदरीत विठु माऊलीच्या छत्रछायेची आध्यात्मिक अनुभूती देणारा हा संग्रह आहे .
“आषाढी वारी पंढरीची” हा ई -डिजिटल काव्यसंग्रह मुद्रीत स्वरूपात यावा असे आवाहन करतो
सुमीत हजारे यांनी अतिशय बोलके मुखपृष्ठ चितारलेले आहे, त्यातील विस्ययजनक भावार्थ बरंच काही सांगून जातो
संपादक उमाकांत आदमाने व कवी रामचंद्र गुरव यांना साहित्य वाटचालीसाठी मंगलमय शुभकामना प्रदान करतो!!!
समीक्षण: विद्रोही कवी साहेबराव मोरे
मो -९४०४०४८६०१
आषाढी वारी पंढरीची -प्रातिनीधिक काव्यसंग्रह
संपादक -उमाकांत आदमाने
प्रकाशन: साहित्यरत्न पुणे
किंमत: फक्त १०/₹
“