
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकऱणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाला झटका देत आता पक्ष हा अजित पवार गटाकडेच दिलाय. दरम्यान शिवसेने प्रमाणेच अजित पवार गट आणि शरद पवार गटातील आमदार हे दोन्हीही पात्र ठरले आहेत. राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला मिळाला आणि शरद पवार यांना जबर धक्का बसला. तर दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरल्याने अजित पवार गटाने मोठा जल्लोष केला. ‘अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे. दोघांचीही अपात्रतेची याचिका फेटाळत दोन्ही गटाचे आमदार पात्र…तर विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवार यांना पक्ष मिळाला. ५३ पैकी ४१ आमदारांचा दादांना पाठिंबा असल्याने अजित पवार यांच्याकडे पक्ष गेला’, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला.