
दिनांक 10/01/2025 प्रशासकिय कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख करुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा – आ.संतोष पाटील दानवे भोकरदन दि. 10 जिल्हा प्रतिनिधी संदीप पा नवल प्रशासकिय कारभार जास्तीत जास्त लोकभिमुख करुन समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवुन देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील सर्व शासकिय विभाग प्रमुखांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आमदार संतोष पाटील दानवे यांनी शुक्रवार दि. 10/01/2025 रोजी तहसिल कार्यालय येथे आयोजित भोकरदन तालुकास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांच्या आढवा बैठकीमध्ये केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, उपविभागीय अधिकारी श्री.दयानंद जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दराडे, तहसिलदार श्री.संतोष बनकर यांच्यासह भोकरदन तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की भोकरदन शहरातील जे मोठे विकास कामे प्रलिंबत राहिले आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करा असे निर्देशही त्यांनी सर्व शासकिय विभाग प्रमुखांना दिले. त्यामध्ये प्रामुख्याने सिल्लोड रोड ते जालना रोडच्या वळण रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पार पाडण्या सोबतच तालुक्यातील जे रस्ते अदयापर्यंत करण्यात आले नाही, त्यांची तपशिवार माहिती घेवुन यादी तयार करावी व त्यांचे प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सुचना आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिल्या. ज्या शासकीय कार्यालयाच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत किंवा मोडकळीस आलेल्या आहेत त्यांचे ही परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन सदर प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आगामी काळामध्ये भोकरदन तालुक्यात सर्व शासकीय विभाग एकाच छताखाली आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असुन एक प्रशासकीय इमारत लवकरच उभरली जाणार आहे. ज्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांना त्यांच्या विविध कामांसाठी प्रत्येक कार्यालयात न जाता एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी सर्वसामान्य नागरिकांना डोळयासमोर ठेवून त्यांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. कार्यालय प्रमुख भारतीय जनता पार्टी भोकरदन जि.जालना