
नाशिक/मालेगाव, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : हिवाळ्यानंतर मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या उन्हाळ्याची यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सुरुवात झाल्याने मालेगावकरांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. उष्णतेच्या लाटेत सध्या नागरिक होरपळत असल्याने शीतपेयांची दुकाने रस्त्यावर थाटलेली दिसून येत आहेत.
यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे धुळ्यातील रस्ते ओस पडत असून शुकशुकाट आहे. शीतपेयांना मागणी वाढली असून टोप्या, उपरणे, गॉगलचा वापर केल्याशिवाय घराबाहेर निघणे अशक्य होत आहे.
आरोग्याची घ्यावी काळजी
उन्हाळ्यात होणारा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चप्पल चा वापर करावा. तसेच प्रवास करताना पाण्याची बॉटल सोबत ठेवावी. आहारात मासे, मटण, तेलकट पदार्थ, शिळे अन्न खाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.