
पाचोरा येथे २२ लाख ५४ हजारांचा गुटखा जप्त
दोघाना 11 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पाचोरा : राज्यात बंदी असलेला २२ लाख ५४ हजार रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा शहरातील जळगाव चौफुलीवर पाचोरा पोलिसांनी पकडला. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुटखा मालक सनी टेकचंद पंजाबी व गाडी चालक दत्तू लालदास बैरागी (चाळीसगाव) या दोघांना अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
जळगाव चौफुलीवरील वरखेडी नाक्याजवळ नाकाबंदी करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, हेकॉ. राहुल शिंपी, पोकॉ. सुनील पाटील, होमगार्ड संजय पाटील यांचे पथक मंगळवारी पहाटे गेले होते. त्यावेळी जामनेरकडून पाचोराकडे येत असलेले एक वाहन पोलिसांना चकवा देत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी हेकॉ. राहुल शिंपी यांनी पाठलाग करीत हे वाहन अडविले.
वाहनाची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये गुटखा व पान मसाल्याचे पुडे आढळून आले. पंचांसमक्ष हे वाहन जप्त केले. गुटख्याच्या ४७ व सुगंधी तंबाखूच्या ३१ गोण्या अशा २२ लाख ५४ हजार किमतीच्या एकूण ७८ गोण्या तर आठ लाख किमतीचे वाहन पोलिसांनी जप्त केले.
याप्रकरणी मालक सनी टेकचंद पंजाबी वाहन चालक दत्तू लालदास बैरागी (चाळीसगाव) यांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.