विजेचे बिल मुदतीच्या आधी भरून देखील ग्राहकांचे वीज कनेक्शन कापणाऱ्या टोरंट पॉवर प्रशासनाला आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला.
महावितरणच्या वेबसाइटवरून का बिलाचा भरणा का करता ? लाईट आमची वापरता तर मग बिलं देखील आम्हालाच भरा अशी दर्पोक्ती टोरंट पॉवरचे अधिकारी विनय रेड्डी यांनी केली होती. दिवा मुंब्रा आणि कळवा या विभागातील सर्व्हिस ही महावितरण कडून टोरंट पॉवर या खाजगी कंपनीला देण्यात आली आहे. पण बिलिंग मात्र महावितरण कडूनच होते. त्यामुळे ही वीजबिले महावितरणच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध होतात. पण ग्राहकांनी महावितरणच्या संकेतस्थळावर वीज बिलाचे पैसे भरल्यानंतरही टोरंट पॉवर कडून बिल भरले नाही हे कारण देऊन नागरिकांची वीज कनेक्शन कापण्यात येत होती. ज्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोरंट पॉवर अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याचा जाब विचारला. यावेळी भविष्यात असे प्रकार होणार नाहीत असे आश्वासन त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच ग्राहकांनी वीज बिल टोरंट किंवा महावितरण कोणालाही बिलं भरली तरी चालतील असे लेखी देण्याचेही मान्य केले.
यावेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग सचिव परेश पाटील, वसंत गुरव, शाखाध्यक्ष सागर निकम, सचिन चव्हाण, दिलीप धामापूरकर, महिला शाखाध्यक्ष नम्रता खराडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.













