
पत्रकार प्रीमियर लीगमध्ये चाळीसगाव संघाने पटकावले विजेतेपद
जळगाव प्रिंट मीडिया उपविजेता
जळगाव – पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या पत्रकार प्रीमियर लीग पर्व १ चा समारोप सोहळा दि. १२ फेब्रुवारी रोजी जळगावात मोठ्या उत्साहात पार पडला. तीन दिवसीय स्पर्धेत चाळीसगाव संघाने अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघाचा पराभव करत विजयी चषक पटकावला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ दाखवल्याने उपस्थितांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
शिवतीर्थ मैदानावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळवण्यात आला. पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनात स्वतः साठी वेळ काढावा आणि जीवनाचा आनंद घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना (उबाठा) महानगराध्यक्ष शरद तायडे, महाराष्ट्र पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे अनिल जोशी, रमेशकुमार मुनोत, विक्रम मुनोत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अयाज मोहसीन, संदीप केदार यांनी केले.
स्पर्धेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. अनिल पाटील, आ.राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, दूध संघाचे अरविंद देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पहिल्याच दिवशी दिवस रात्र पद्धतीने ८ सामने खेळवण्यात आले.
पत्रकार प्रीमिअर लीगच्या शेवटच्या दिवशी जळगाव पोलीस विरुद्ध संपादक असा मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जळगाव पोलीस संघाने सहज विजय मिळवला. सायंकाळी महसूल विरुद्ध आयोजक समिती सामन्यात आयोजक समितीने
विजय प्राप्त केला. यावेळी पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करावी, असा सल्ला पोलीस अधीक्षकांनी दिला.
पत्रकार प्रीमियर लीग निकाल
तीन दिवसीय स्पर्धेत अंतिम विजेता चाळीसगाव संघ ठरला तर उपविजेता संघ जळगाव प्रिंट मीडिया संघ ठरला. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक अमळनेर संघाने तर चतुर्थ क्रमांक धरणगाव संघाने पटकावला. स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अमळनेर संघाचा आर. जे. पाटील, बेस्ट बॉलर चाळीसगाव संघाचा रवींद्र कोष्टी तर बेस्ट बॅट्समन चाळीसगाव संघाचा महेश पाटील हा खेळाडू ठरला. स्पर्धेत जिल्हाभरातील पत्रकारांच्या संघासह, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाया संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आ. अनिल पाटील यांनी देखील खेळण्याचा आनंद लुटला.