प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर मालेगाव : प्रतिवर्षी सालाबादप्रमाणे, प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यातील आपल्या मालेगाव शहरांमध्ये चैत्र शुद्ध नवमी म्हणजे श्रीराम नवमीच्या दिवशी श्रीराम मंदिर, मारवाडी गल्ली, मालेगाव कॅम्प पासून ते श्रीराम मंदिर, रामसेतू फुल, मालेगाव पर्यंत श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा व पारंपारिक मिरवणुकीचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील सदर शोभायात्रा मिरवणूक दिनांक 17 एप्रिल 2024, बुधवार रोजी सायंकाळी 05.00 वाजेपासून काढली जाईल. सदर मिरवणुकीमध्ये मालेगाव शहरातील सर्व रामभक्त माताभगिनी, युवक व हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती, मालेगावच्या वतीने करण्यात आलेले आहे.
शोभायात्रा मिरवणुकीची रूपरेषा पुढील प्रमाणे :-
मिरवणुकीच्या प्रथमदर्शनी भागात हिंदू धर्माचे मानबिंदू असलेला धर्मध्वज राहणार आहे. धर्मध्वजाच्या पाठीमागे ज्ञानेश्वर पाटील, (पिंटू वस्ताद) भडगाव यांचा ‘बादशहा’ नामक अश्व नृत्याविष्कार सादर करत उपस्थित भाविकांचे स्वागत करणार आहे. सदर मिरवणुकीमध्ये हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उभारण्यात आलेला गुढीपाडव्याचा चित्ररथ; युद्धासाठी सज्ज असलेल्या धनुर्धारी प्रभू श्रीरामचंद्रांची प्रारंपारिक प्रतिमा असलेला चित्ररथ; श्रीराम, सीता, हनुमान, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या सजीव देखाव्याची आरास असलेला रामपंचायतन दरबारचा चित्ररथ; अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी स्थापन झालेल्या रामलल्लाच्या मूर्तीचा चित्ररथ; अकरा फूट उंच भगवान शंकराच्या मूर्तीचा चित्ररथ आणि श्रीरामाच्या 15 फूट उंच मूर्तीचा चित्ररथ; अशा प्रकारे वेगवेगळे चित्ररथ उपस्थित रामभक्तांना आकर्षण म्हणून सादर केले जाणार आहेत.
श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा मिरवणुकीमध्ये ढोल, डफ, ताशा, टिमकी, हलकडी, सांबळ, झांज, शंख इ. वाद्य असलेले पारंपारिक पथक, शिवकालीन मर्दानी खेळ सादर करणारे मालेगाव येथील श्रीराम पथक; आदिवासी डांगी व टिपरी नृत्य सादर करणारे आदिवासी महिला व पुरुषांचे पथक; जय बजरंग तालीम संघचा बाहुबली स्वरूप असलेला हनुमान; मालेगाव कॅम्प येथील स्वामिनी महिला लेझीम पथक व जय अंबे वारकरी महिला पथक सहभागी होणार आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोसम पुलावर फटाक्यांची आतिषबाजी व रोषणाई असलेल्या कमानी मधून फायर शो करत शोभायात्रा मिरवणूक संगमेश्वर भागात प्रवेश करणार आहे.
श्रीराम नवमी उत्सवाची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत वाढवून मिळणे; मिरवणूक मार्गातील विद्युत वायर व अतिक्रमण काढणे; मिरवणूक मार्गावर स्वच्छता राबवत रस्ते व खड्ड्यांची डागडुजी करणे; मिरवणूक मार्गावरील वाहतूक वळवून नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आदी मागण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समिती, मालेगावच्या माध्यमातून अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे. सदर मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी खा. डॉ. सुभाष भामरे व पालकमंत्री दादा भुसे यांची मदत घेतली जाईल.
श्रीराम जन्मोत्सव समिती, मालेगावच्या माध्यमातून आचारसंहितेचे पालन करत शहरातील प्रमुख भागांमध्ये डिजिटल बॅनरच्या माध्यमातून प्रचार, स्थानिक भागांमध्ये बैठका घेऊन उत्सवाचे जाहीर निमंत्रण, शहरातील विविध समाज, पंथ, संप्रदाय, पक्ष, संघटना, संस्था यांच्या प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून दिलेले निमंत्रण आदी माध्यमातून प्रचार प्रसार सुरू आहे.
सदर पत्रकाद्वारे आवाहन करण्यात येते की, पाचशे वर्षापासून तंबूमध्ये निवासाला असलेले प्रभू श्रीरामचंद्र यंदाच्या वर्षी अयोध्येमध्ये भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये स्थापित होऊन विराजमान झालेले दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या रामचंद्रांच्या जन्मोत्सवाला म्हणजे श्रीराम नवमीला सर्व रामभक्त हिंदू बांधव व माता भगिनींमध्ये आगळे वेगळे चैतन्य व उत्साह आहे. आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी मालेगावकर रामभक्तांनी आपापसातील जात, समाज, पंथ, सांप्रदाय, पक्ष, संघटना, व्यक्ती आदी मतभेद बाजूला ठेवून चैत्र शुद्ध नवमी, दि. 17 एप्रिल 2024, बुधवार रोजी मालेगाव कॅम्प येथील श्रीराम मंदिर, मारवाडी गल्ली पासून श्रीराम मंदिर, रामसेतू पूल पर्यंत साजऱ्या होणाऱ्या श्रीराम जन्मो शोभायात्रा व पारंपारिक मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.