ताज़ा ख़बरें

बसच्या धडकेत गंभीर जखमी सदानंद चौधरी यांचे अखेर निधन


चाळीसगाव: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (ता. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास बसने पुढे चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तेली समाज युवक मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद चौधरी (वय ५१) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना तातडीने धुळे येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.सकाळी सहा वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचेवर सायंकाळी पाच वाजता चाळीसगांव येथे अंतीमसंस्कार करण्यात आले.यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट, मिञपरीवार समाज बांधव, विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने शोकाकूल उपस्थित होते.
*बसचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल*
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सदानंद चौधरी हे आपल्या ॲक्टिव्हाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गिरनार स्वीट समोरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या मागून येणारी शहादा ते छत्रपती संभाजीनगर बस (एमएच २०, बीएल ३१०९) चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची सदानंद चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात सदानंद चौधरी यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. त्यांना तत्काळ डॉ. देवरे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळ्याला हलविण्यात आले होते. या चौकात अनधिकृत सर्रास लावल्या जाणाऱ्या डिजिटल बॅनर्समुळे हा अपघात घडल्याची चर्चा आहे. अत्यंत रहदारीचा असलेला चौक कायमस्वरूपी बॅनरमुक्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी बसचालक रामदास खैरनार (वय ४४, रा. धुळे) याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
*मनमिळावू युवा व्यक्तिमत्त्व सदानंद चौधरी*
चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष (कै.) मधुकर उखा चौधरी यांचे जेष्ठ पुत्र असलेले सदानंद भाऊ यांना राजकीय वारसा घरातून मिळाला होता. वडील स्व.मधू आण्णा चौधरी हे सलग सहा वेळा नगरसेवक तर तेली समाजाचे अध्यक्ष असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क हा सदानंद भाऊंना वेगळी ओळख देवून गेला होता. कॉलेज जीवनापासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. एन एस यु आय या विद्यार्थी संघटनेचे ते शहर आणि तालुका अध्यक्ष राहिले. राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान काढून त्यांनी सामाजिक उपक्रमाचा श्रीगणेशा केला. यानंतर त्यांनी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्मिती होत असताना ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मोठी जबाबदारी दिली. त्यांच्या यशाच्या आलेख असा सतत उंचावत राहिला. घरचा हॉटेल व्यवसायाला त्यांनी नवीन झळाळी देत शहरातील प्रमूख चौकातील सदानंद पॅलेस ची निर्मिती केली. घरात मधूआण्णा यांच्या पाच भावात सर्वांत मोठा असल्याने सदानंद भाऊ यांना सर्व मोठाभाऊ म्हणत. वडिलांचा व्यवसाय आणि सामाजिक वारसा सांभाळताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. त्यात ते सरस ठरले. वडिलांच्या नावाने त्यांनी पतसंस्था सुरु केली. माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या सोबतीने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या सोबत देखील त्यांनी काही काळ काम केले. गेल्या पाच सहा वर्षांपासून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याशी घनिष्ट संपर्क आला. हॉटेल व्यावसायिक असल्याने व मोठा चौधरी समाजातील सात्यत्याने होत असलेल्या विवीध कार्यक्रमात भोजनाची व्यवस्था सांभाळत असल्याने त्यांचा भोजन व्यवस्था सांभाळायचा हातखंडा होता. आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडील कुठल्याही कार्यक्रमाची भोजन व्यवस्था त्यांनी चोख सांभाळली होती. त्यामुळे त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचा मोठा विश्वास संपादन केला होता. भाजपचे शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी नवीन जबाबदारी घेतली होती.त्यातच त्यांचा विनम्र स्वभाव यामुळे ते तालुकाभरात लोकप्रीय होते. त्यांचा मोठा अपघात घडल्याचे कळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तत्काळ धाव घेतली. चाळीसगाव येथून धुळे येथे ते स्वतः जखमी सदानंद चौधरी यांच्यासोबत दवाखान्यात होते. यावेळी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी देखील रात्री उशिरापर्यंत दवाखान्यात थांबून उपचाराची माहिती घेतली.
*दोन दिवसांची अपयशी झुंज*
अपघात झाल्यानंतर त्यांना विघ्नहर्ता धुळे येथे दाखल करण्यात आले होते तेव्हापासून त्यांची मृत्यूची सलग साठ तास झुंज सुरू होती आज मंगळवार सकाळी सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या दुःखद निधनाने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सदानंद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असून देखील विनम्र मोठ्या परिवाराचा धनी असलेले सदानंद भाऊ एक युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी शहर तालुका व जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार कमावला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ ,बहीण,काका,काकू,नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहराच्या सामाजिक पटलावरील एक उमदे व्यक्तीमत्व हरपल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत होती.त्यांचा दुःखद निधनाने शहरात काही काळ बाजारपेठ बंद होती.
*शोकाकूल वातावरणात अंतीमसंस्कार*
सायंकाळी सहा वाजता स्व. सदानंद भाऊ चौधरी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे महामंत्री विजय चौधरी, आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार साहेबराव घोडे, माजी महापौर भगवानबापू करंकाळ यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.यावेळी राजकीय सामाजिक अशा विविध क्षेत्रातील शोकाकूल बांधव उपस्थीत होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!