
मालेगाव/नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : शहरासह तालुक्यातील तीन विविध ठिकाणांहून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. दुचाकी चोरटे सापडूनही चोरीचे हे सत्र थांबत नसल्याचे यावरून अधोरेखित होत आहे.
तालुक्यातील सौंदाणे येथील कृषी सेवा केंद्र समोर उभी केलेली एम एच ४१ वाय ३७४३ ही दुचाकी अनोळखी चोरट्याने बनावट चावी लाऊन चोरून नेली. यासंदर्भात राजाराम विठ्ठल अहिरे (६०) रा. टाकळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते कामानिमित्त सौंदाणे येथे आले होते. त्यांनी आपली दुचाकी एका कृषी सेवा केंद्र समोर उभी केली होती. ती चोरीला गेली. राजाराम अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पो. हवा. पवार हे तपास करीत आहेत.
शहरातील सटाणा रोडवरील वैद्य हॉस्पिटल जवळ उभी केलेली एम एच ४१ झेड १७५१ ही दुचाकी अनोळखी चोरट्याने हॅण्डलॉक तोडून चोरून नेली. याप्रकरणी रवींद्र पुंडलिक पायमोडे (३९) रा. नामपूर रोड, मालेगाव यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पो.ना. देसले हे तपास करीत आहेत. कमालपूरा भागातूनही एमएच ४१ बीए ४७११ ही दुचाकी अनोळखी चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फैयाज अतहर हुसेन (४०) रा. कमालपूरा याने शहर पोलीस ठाण्यात फरियाद दिली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पो.हवा.शेवाळे हे तपास करीत आहेत.