क्राइममहाराष्ट्र

सोमनाथच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांइतकेच कारागृह प्रशासनही दोषी

राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अ‍ॅड.गोरक्ष लोखंडे यांचे मत

परभणी(प्रतिनिधी)कायद्याचा विद्यार्थी असलेला सोमनाथ सुर्यवंशी हा युवक पोलिसी अत्याचाराचा बळी ठरून त्याचा दुदैवी मृत्यू झाला ही अतिशय निषधार्ह घटना आहे. त्याला झालेली अमानवीय पध्दतीची मारहाण आणि न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेला असल्याने पोलिसांइतकेच कारागृह प्रशासनही त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे असे मत व्यक्त करत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असून आयोगाकडूनही पिडीतांना कायदेशीर मदत केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) अ‍ॅड.गोरक्ष लोखंडे यांनी पत्रकार परिषइेत दिली.

अ‍ॅड.श्री.लोखंडे हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता गुरूवारी (दि.26) सकाळी परभणीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झालेल्या जागेची पाहणी केली. आंबेडकरी चळवळीतील नेते दिवंगत विजय वाकोडे आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची त्यांंनी भेट घेतली. यावेळी त्यांना परभणीत झालेल्या संपुर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली. त्यानंतर सावली शासकीय विश्रामगृहात अ‍ॅड.लोखंडे यांंनी पत्रकारांशी संवाद साधला.

अ‍ॅड.लोखंडे म्हणाले की, परभणीत घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. भारतीय संविधानाचा अवमान झाल्यानंतर आक्रमक आंदोलन सुरू झाले आणि त्याने उग्र रूप धारण केले. बाबासाहेबांची अस्मिता ज्यांच्या ज्याच्या मनात आहे तो प्रत्येकजण पेटून उठला. यात अनेक सुशिक्षीत युवकांवर कारवाई झाली, काहींवर अजामीनपात्र गुन्हे दाखल झाले. दलित समाजातील सुशिक्षित तरूण सोमनाथचा पोलिसी अत्याचाराने बळी घेतला. एखाद्या आंदोलकावर गुन्हे लावताना पोलीस प्रशासनाने विचार करायला हवा होता. कारण सामाजिक आंदोलन हाताळताना एवढ्या अमानुष पध्दतीने मारहाण करायला नको होते. पोलिसांकडून मारहाण झाल्यानंतर सोमनाथ दोन दिवस न्यायालयीन कोठडीत होता आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याठिकाणी त्याला काय वेदना होत आहेत हे पाहणे गरजेचे होते. यामुळेच पोलिसांबरोबरच कारागृह प्रशासन दोषी असून चौकशीअंती संबंधितांवर कठोर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. पोलीस यंत्रणेने कायद्याच्या शस्त्राचा अमानवीय वापर केला असल्याचे या प्रकरणात दिसत असल्याचे निरीक्षणही अ‍ॅड.लोखंडे यांनी यावेळी नोंदवले.

आंदोलकांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक पाहून हे काय चालले आहे हा प्रकार सहन न झाल्याने आणि पोलिसांकडून वाढत्या दबावाच्या धक्क्याने विजय वाकोडे यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पिडितांना कायदेशीर मदत करू तसेच पोलीस यंत्रणा, शासकीय रूग्णालय आणि कारागृह प्रशासनाची चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य प्रकारे कार्यवाही करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व पिडितांनी आयोगाकडे तक्रारी करावाव्यात, लवकरच त्यावर सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल्, असेही त्यांनी सांगितले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!