
नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : गंगापूर जकात नाका येथे मद्यपी टोळक्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
या दगडफेकीत तीन वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून एक जण फरार झाला आहे.
जय गजभिये (रा. प्रमोद नगर) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.१३) रात्री साडेदहाच्या सुमारास गंगापूर जकात नाका येथून स्वतःच्या कारने जात होते. त्यावेळी तिघा मद्यपी संशयितांनी रस्त्यात गोंधळ घालत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबवले. तसेच तीन वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली व वाहन चालकांना शिवीगाळ केली.
या घटनेने परिसरात दहशत पसरली होती. या दगडफेकीत तीन वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास करीत दोघांना ताब्यात घेतले, तर एक संशयित फरार झाला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.