
चाळीसगाव-नांदगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
आठवड्यात तिसऱ्या बळीनंतर ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन
चाळीसगाव चाळीसगाव-नांदगाव रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. अवजड वाहतूक आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, एकाच आठवड्यात तिसरा बळी गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे हा उद्रेक झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कन्नड घाटाच्या प्रश्नामुळे चाळीसगाव-सोलापूर महामार्गावरील अवजड वाहतूक आता चाळीसगाव-नांदगाव मार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून, पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
अपघातांची मालिका: काही दिवसांपूर्वी खडकी गावाजवळ अण्णा वाल्मीक तांबे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच, सोमवारी पहाटे
५:४५ वाजता त्याच ठिकाणी पुन्हा अपघात झाला. आबा जंगलु जानराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर भगवान कोल्हे गंभीर जखमी झाले, शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ठाकुर वाडी येथील पुष्पाबाई
पितांबर ठाकुर (वय ७४) यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.
संतप्त ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी अंत्यविधीपूर्वी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक अमित मनेळ घटनास्थळी दाखल झाले. आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधत आज सायंकाळपर्यंत गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी १०:३० च्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.