
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील निलंबित
शिव प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण भोवली : मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
शिरपूर : श्री शिव प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली. निरीक्षक पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हादेखील दाखल करण्यात आला असून घडल्या प्रकाराची पोलीस उपअधीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. निरीक्षक पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिरपूर शहरात शनिवारी विराट मोर्चा काढण्यात आला.
काय घडले नेमके शिरपूरात
सूत्रांच्या माहितीनुसार, श्री शिव प्रतिष्ठानचे तालुकाप्रमुख जयेश पाटील यांच्यासह पदाधिकारी एका प्रकरणात कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी निरीक्षक के. के. पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
तक्रारीची वरिष्ठ स्तरावर दखल : पोलीस निरीक्षक निलंबित
शिरपूर शहर निरीक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी करण्याचे आदेश धुळे शहर विभागाचे एसडीपीओ राजकुमार उपासे यांना देण्यात आल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली. पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास साक्रीचे पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्याकडे देण्यात आला असून शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा पदभार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे तात्पुरता देण्यात आल्याची धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली.