
मुंबई (प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या शिल्पकारांना एकत्र आणून त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन, सर्जनशीलतेला वाव आणि शिल्पकलेच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘प्रोग्रेसिव्ह स्कल्प्टर्स असोसिएशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
शिल्पकला ही केवळ कलानिर्मिती नसून भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र बदलत्या काळात शिल्पकारांसमोर बाजारपेठ, व्यावसायिक मार्गदर्शन, प्रदर्शनांच्या संधी, सार्वजनिक कला प्रकल्प, कायदेशीर बाबी, डिजिटल माध्यमे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी यांसारखी अनेक आव्हाने आहेत. ही गरज लक्षात घेऊन प्रोग्रेसिव्ह स्कल्प्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून शिल्पकारांना एकत्रित व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ आणि नवोदित शिल्पकारांना एकत्र आणणार
या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिल्पकार, नवोदित कलाकार, कला शिक्षक, संशोधक आणि कला विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये संवाद व सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. नवोदित कलाकारांना अनुभवी शिल्पकारांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांच्या कलाकृतींना योग्य व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
आजच्या बदलत्या काळात शिल्पकारांना केवळ कलानिर्मिती पुरेशी नाही, त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन, कायदेशीर माहिती, प्रदर्शनांच्या संधी, सार्वजनिक कला, संशोधन, डिजिटल माध्यमे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी यांचीही आवश्यकता आहे. या गरजा लक्षात घेऊन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती प्रसिद्ध शिल्पकार प्रदिप शिंदे, दीपक थोपटे, निलेश पोळकर, नंदू कुलये, वैभव गायकवाड यांनी दिली आहे.












